मुंबई - सहकारी घोटाळ्यातील गैरव्यवहार प्रकरणात सर्वात पहिला गुन्हा राजू शेट्टींनी दाखल केला होता. साखर कारखान्यांच्या बेकायदा विक्रीप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 19 ऑक्टोबर 2016 रोजी तक्रार दिली होती. राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळासह विविध तत्कालीन संचालक अशा 89 जणांची नावे त्यात देण्यात आली होती. शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईनंतर राजू शेट्टींनी आपली भूमिका सांगितली आहे.
मी चुकीचं समर्थन करणार नाही, जे आहे ते आहे. 10 वर्षांपूर्वी माझी जी भूमिका होती, ती आजही कायम आहे. पण, या सगळ्याचा भाजपा आणि सरकारकडून आपल्या सोयीनं वापर करुन घेतला जातोय, याला माझा आक्षेप आहे, असे राजू शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच, चौकशी झालीच पाहिजे, चोरांना पकडलंच पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मी 4 वर्षांपूर्वीच ईडीच्या कार्यालयात गेलो होता. त्यावेळी, त्यांनी एफआयआर दाखल झाला पाहिजे असं मला ईडीच्या संचालकांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनाही सातत्याने भेटलो होतो, पण त्यांनीही याकडे दुर्लक्ष केलं. 60 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, असा अनुभवही राजू शेट्टींनी बोलून दाखवला.
राज्य सहकारी बँक प्रकरणातील आरोपींवर जो आरोप आहे, तो म्हणजे राज्य सहकारी बँकेचे ते संचालक होते. या संचालकांनी अपात्र आणि नियमबाह्य कर्ज दिलं, हा त्यांच्यावर आरोप आहे. ज्यांनी ते कर्ज घेतले, त्या कर्जाचा वापर करुन घेतला. ज्यांनी कर्ज घेतलं ते आज भाजपात आहेत, याचं मला वाईट वाटतंय, असेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आणि शिखर बँक पूर्णत: अजित पवार यांच्या अधिपत्याखाली असताना सन 2009 ते 2011 या कालावधीत 25 हजार कोटींचा कथित घोटाळा घडल्याची तक्रार आहे. राजू शेट्टी, अन्ना हजारे आणि मेधा पाटकर यांनी याप्रकरणात तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारदाराने नोंदवलेल्या 'एफआयआर'मध्ये चार ठिकाणी शरद पवार यांचा उल्लेख आहे. राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचे कर्तेकरविते शरद पवार आहेत, त्यांच्याच सांगण्यावरुन बँकेच्या संचालकांनी घोटाळा केला, या स्वरुपाचा आरोप 'एफआयआर'मध्ये आहे. त्याचा आधार घेत शरद पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.