मुंबईः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले गिरीश महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा आविर्भावात फिरताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून त्यांना लक्ष करण्यात येत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, या सत्ताधाऱ्यांकडे संवेदनशीलता नाही. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची गरज आहे. एक इंचही जमीन शिल्लक राहिलेली नाही. यांना फिरायला हेलिकॉप्टर मिळतं पण लोकांना बाहेर काढायला नाही. 2005मध्ये पूरस्थिती गंभीर होती. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी लष्कराचं हेलिकॉप्टर मागवून लोकांना रेस्कू केलं होतं. अजून यांची काय संवेदनशीलता बघायची. भाजपाचा बॅनर लावून मदत करत आहेत. मदतीच्या माध्यमातूनही प्रचार करायचा सोडत नाही. इकडे पूरस्थिती आहे आणि यांना मात्र राजकारण महत्त्वाचं वाटतं, आपण काय तरी करतोय हा देखावा यांना करायचा आहे. एका गावाला 2 ते 3 बोटी दिल्यात, गावाची लोकसंख्या शेकडोंच्या घरात आहे. एवढ्याशा बोटी शेकडो लोकांना बाहेर कशा काढणार?, अशी सगळी संतापजनक परिस्थिती आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! 'त्या' लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री या संवेदनशील वागण्याची दखल घेणार का?, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.
तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. एवढा भीषण गंभीर पूर सांगली-सातारा-कोल्हापुरात पसरला आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जनावरं नदीत सोडून दिली आहेत, घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत मंत्री सेल्फी काढत असल्यास आपलं दुर्दैवच आहे. आजही पालकमंत्री हजर नाहीत. पुनर्वसन कार्य ज्यांच्याकडे आहे ते उपस्थित नाहीत. एनडीआरएफच्या 3 ते 4 बोटी आताशा आल्या आहेत. सरकारच्या ढिसाळ कारभारानं माणसं वैतागलेली आहेत. काल दिवसभर एकही बोट फिरकली नाही. आम्ही आमची व्यवस्था पोहोचवायला लागलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.