Raju Shetty : 'फडणवीसांच्या काळात गुंठ्याला 950 रुपये मदत मिळाली, आत्ताच्या सरकारने 135 रुपये दिली'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:42 PM2021-10-10T19:42:17+5:302021-10-10T19:43:14+5:30
Raju Shetty : फडणवीसांच्या काळात पूरग्रस्तांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता, आताही तसाच निर्णय घ्यायला हवा होता. उद्धव ठाकरेंनी स्वत: ट्विट केलं होत, मला बैठकीत आश्वासनही दिलं होतं
मुंबई - राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे मदत मिळालीच नसल्याचं माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलं आहे. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति गुंठा मिळालेली मदत सांगताना, फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकारमधील फरस स्पष्टपणे सांगितला आहे. त्यानुसार, फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत मिळाली होती. या सरकारने केवळ आश्वासन दिलं, पण मदत तोकडीच दिली, असेही राजू शेट्टींनी म्हटले.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात फडणवीस सरकारच्या काळात पीकविमा आणि निधी शेतकऱ्यांना चांगली मदत मिळत होती, याचे वृत्तही झळकले. त्यातुलनेत सध्या सरकारबाबत आपलं मत काय असा प्रश्न राजू शेट्टींना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणं शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी मीच केली होती. तो निर्णय योग्यच होता, देवेंद्र फडणवीसांनी घेतला म्हणून तो निर्णय चुकीचा होता, असे मी म्हणणार नाही.
फडणवीसांच्या काळात पूरग्रस्तांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता, आताही तसाच निर्णय घ्यायला हवा होता. उद्धव ठाकरेंनी स्वत: ट्विट केलं होत, मला बैठकीत आश्वासनही दिलं होतं. 2019 च्या शासन निर्णयप्रमाणेच मदत मिळेल. पण, 2 महिन्यांपूर्वी मी जो मुद्दा उपस्थित केला होता, तसंच घडलं. गुंठ्याला 135 रुपयाप्रमाणे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले. जे 2019 च्या निर्णयानुसार त्यावेळेसच्या सरकारने गुंठ्याला 950 रुपये दिले होते. त्यामुळे, जे बरोबरंय त्यास मी बरोबरच म्हणणार, जे चुकीचं आहे, त्यास मी चूकच म्हणणार.
वसंत दादा पाटील यांची आठवण येते
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत तोकडी आहे, सरकारकडे पैसा नसल्याचं सरकार सांगत आहे. पण, अशा परिस्थितीने सरकारने पैसा उभा करायचा असतो. आज वसंत दादा पाटील यांची आठवण येते, वसंत दादा असते तर त्यांनी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असते, असे म्हणत राजू शेट्टींनी शेतकऱ्यांबद्दलच्या सरकारी धोरणावर टीका केली. लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे रोजगार बुडाले. पण, सरकारी नोकरदारांना 5 ते 10 टक्के उपस्थिती असतानाही संपूर्ण पगार मिळाला. घरी बसून सरकारी कर्मचाऱ्यांनी पगारी घेतल्या, गेल्याच आठवड्यात त्यांना सरकारने महागाई भत्ताही दिला. वसंत दादा पाटील आज असते तर त्यांनी स्पष्टच सांगितलं असतं.
सरकारी नोकरदारांना 50 टक्केच पगार दिला असता
सरकारी नोकरदारांनो, तुम्ही घरी बसून पगार घेतलाय, सरकार आता तुम्हाला 50 टक्के पगार देईन. 50 टक्के पगार तुम्हाला सरकार देईल, पण आज 50 टक्के पगारावरच घर चालवा, असे वसंत दादांनी म्हटले असते. महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे, आज आपण त्याला मदत करूया, असे वसंत दादांनी म्हटलं असतं. आज महाराष्ट्राला वसंत दादांची आठवण येतेय. शेतकरी आज रस्त्यावर आलाय, त्या शेतकऱ्याला खरी गरज आहे मदतीची. तुम्हाला शिवारात आणखी झाडाला लटकलेली शेतकऱ्यांची प्रेतं पाहायची आहेत का?, अशा शब्दात राजू शेट्टींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.