मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील अनेक घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, आज मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामध्ये सिंचनाचा अभाव असल्याने देखील शेतकरी आत्महत्या करत असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच त्यामुळे सिंचन घोटळ्यात काय झालं, त्याला कोण जबाबदार आहे याबद्दल आम्हाला काही देणंघेणं नसून सिंचनावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करुन देखील सिंचन वाढलं कसं नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात जाहिर करण्यात आलेल्या कर्जमाफीत निकष लावण्यात आले असून या निकषामध्ये सहा ते सात हजार कोटींच्यावर रक्कम जात नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच सरकारने कर्जमाफीबाबत चुकीचा आकडा मांडला आहे किंवा मग 31 हजार कोटींची बेरीज करुन दाखवावी असं राजू शेट्टी यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, २०१९ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मार्च, २०२० पासून लागू होईल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आल्याने राजू शेट्टी यांनी याआधीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.