मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले असून महाविकास आघाडीचं सरकार राहणार की जाणार याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी शिवसेना विधानसभेत प्रस्ताव मांडणार आहे. त्यामध्ये जवळपास एकनाथ शिंदेंसह १६ आमदार आहेत. यावर विधान सभा नरहरी झिरवळ हे घाई घाईत निर्णय घेतील. परंतु, तसे करणे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल, असे पत्र आता अपक्ष आमदाराने विधानसभा सचिवांना पाठवले आहे. त्यामुळे, या घडामोडींकडे आता कायदेशीरदृष्टीने पाहिले जात आहे. त्यातच, माजी खासदार राजू शेट्टींनी या सरकारबद्दल आणि चालू घडामोडींबद्दल मत व्यक्त केलं आहे.
महाविकास आघाडी सरकार पडतंय याचं मला अजिबात दु:ख नाही. मागील 2 महिन्यांपूर्वीच मी सरकारचा पाठिंब काढून घेतलाय. कारण, हे सरकार जनताबहुल राहिलेलं नाही, हे स्पष्ट होतंय. परंतु, ज्या पद्धतीने ते पाडलं जातयं. विशेषत: भाजपकडून पाशवी वृत्तीने हे सरकार पाडलं जात आहे, असे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. यापूर्वी, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र सरकार पाडून भाजप सत्ता हस्तगत करत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक आहे. भाजपकडे ईडी, आयटी आणि सीबीआय यांसारखे प्रभावी कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातूनच या उलथापालथी होत आहेत, असेही त्यांनी म्हटलंय.
अपक्ष आमदारांचे सचिवांना पत्र
नरहरी झिरवळ यांच्याविरोधात आधीपासूनच अपात्र ठरविण्याचा, पदावरून हटविण्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना त्यांनी असे करणे चुकीचे असल्याचे पत्र अपक्ष आमदार महेश बाल्दी आणि विनोद अग्रवाल यांनी दिले आहे. या दोन आमदारांनी झिरवाळ आणि विधान सभा सचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आम्ही महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य आहोत. आम्ही २०१९ मध्ये कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविली नव्हती, यामुळे आम्ही अपक्ष आमदार आहोत.
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज हॉटेलबाहेर पडले आहेत. संख्याबळ जमताच शिंदे यांनी गुवाहाटीहून थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे यांनी मातोश्रीविरोधात बंड पुकारत मी शिवसेनेतच असल्याचे म्हटले आहे. तसेच हिंदुत्व आणि बाळासाहेब हे आमची भूमिका आहे, असेही म्हणत त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंचे नेतृत्व नाकारले आहे. असे असताना भाजपाचे नेते मात्र, गप्प आहेत. अशावेळी शिंदे यांना दिल्लीमधून ऑफर मिळाल्याचे समजते आहे.