"...अर्थात राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:34 PM2022-06-22T12:34:46+5:302022-06-22T12:35:59+5:30
राज्य सरकार कोसळण्याच्या मार्गावर असून एकनाथ शिंदेंचं बंड शमविण्यात शिवसेना नेतृत्त्वाला अपयश आल्याचं दिसून येते आहे.
मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडींनी आता वेग घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुखांची चांगलीच गोची झाली आहे. राज्याच्या राजकारणात धुराळा उडाला असून प्रत्येकजण यावर आपलं मत व्यक्त करत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकार कोसळण्याच्या मार्गावर असून एकनाथ शिंदेंचं बंड शमविण्यात शिवसेना नेतृत्त्वाला अपयश आल्याचं दिसून येते आहे. सूरतमध्ये असलेले शिवसेना आमदार सध्या गुवाहटीला हलविण्यात आले आहेत. त्यावेळी, मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेंबाचा हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन आम्ही जातोय, असे ते म्हणाले. तसेच, आम्ही शिवसेना पक्ष सोडला नाही, कुठल्याही पक्षात गेलेलो नाहीत, असेही त्यांनी म्हटलंय.
राजू शेट्टी यांनी ट्विट करुन सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली बघून लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनाला वेद होत आहेत. अर्थात राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत राजू शेट्टींनी व्यक्त केलंय. त्यामुळे, राजू शेट्टींनी नेमका कोणत्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
@ANIpic.twitter.com/XpTXzfqhjq
— Raju Shetti (@rajushetti) June 22, 2022
राजीनामा देण्याच्या तयारीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीनंतर शिवसेना आमदार- खासदारांच्या बैठकीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे.
४० आमदार सोबत - शिंदे
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.