मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, २०१९ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मार्च, २०२० पासून लागू होईल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजू शेट्टी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांचे अश्रु फुसण्यासाठी गेले होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मी तुम्हाला पूर्णपणे चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करतो असं आश्वासन दिले होते. परंतु कर्जमाफीच्या या योजनेअंतर्गत दिलेलं आश्वासन पूर्ण होताना दिसत नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की सरकारने घाईगडबडीत निर्णय न घेता संपूर्ण माहिती घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेण्याची गरज होती. अजूनही वेळ गेलेली नाही, पुन्हा विचार करुन कर्जमाफीतच्या योजनेत बदल करण्याची विनंती देखील राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राजू शेट्टी यांना भाजपा सरकारच्या काळात जाहिर केलेल्या कर्जमाफीवर तुम्ही समाधीनी होतात का असा प्रश्न विचारला असता भाजपाने जाहिर केलेल्या कर्जमाफीवर समाधानी नव्हतो असं त्यांनी सांगितले. तसेच भाजपाने घोषणा आणि आकर्षित घोषणा केल्यामुळे महाविकासआघाडीच्या सरकारला पुन्हा नव्याने कर्जमाफी जाहिर करण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र आता ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे सरकारने केलेली कर्जमाफी फक्त 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकरी अपात्र राहणार आहे.