Join us  

राजू शेट्टी अचानक 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकी काय चर्चा झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 6:14 PM

राजू शेट्टी यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने ते पुन्हा महाविकास आघाडीत सामील होण्याच्या प्रयत्नात आहेत का, अशी चर्चा सुरू झाली होती.

Raju Shetty Met Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाली नसून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळावा, यासाठी मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, असा खुलासा राजू शेट्टींनी केला आहे.

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील लोकसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीने लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना हातकणंगले मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. मागील काही महिन्यांपासून राजू शेट्टी हे महायुतीसह महाविकास आघाडीच्याही विरोधात हल्लाबोल करत असून आम्ही यापुढे स्वतंत्रपणे निवणुकांना सामोरे जाणार असल्याचं शेट्टी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आज त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने ते पुन्हा महाविकास आघाडीत सामील होण्याच्या प्रयत्नात आहेत का, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु महाविकास आघाडीत सामील होण्याचा कोणताही विचार नसल्याचं शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडीबद्दल नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, "महाविकास आघाडीसोबत माझं काहीही देणं घेणं नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक पद्धतीने एफआरपीचे तुकडे केले, भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून रस्त्याजवळ जमिनीचा शेतकऱ्यांना जो चार ते पाच पट मोबदलला मिळायचा तो कमी करण्याचं काम महाविकास आघाडीचे सरकारने केलं," अशी टीका करत राजू शेट्टी यांनी आपण मविआसोबत जाणार नसल्याचं सांगितलं आहे.  

"उद्धव ठाकरेंची मदत घेणार"

"उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अदानी उद्योग समूहाविरोधात जी लढाई सुरू आहे त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे. केंद्र सरकारने अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही. २००० साली  चार हजार रुपये इतका भाव होता, २४ वर्षानंतर तो आताही तेवढाच आहे. याचं कारण मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशांतून आयात झालेल्या कच्च्या तेलावर आयात शुल्क २०२५ पर्यंत पाच टक्के कमी केल्यामुळे परिणाम झाला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मी मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे. या लढाईत आम्ही उद्धव ठाकरे यांची मदत घेणार असून उद्धव ठाकरेंनीही आम्हाला त्याबाबत आश्वस्त केलं आहे," असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :राजू शेट्टीउद्धव ठाकरेमहाविकास आघाडीनिवडणूककोल्हापूरसांगली