राजुल पटेल यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने वर्सोव्यातील उद्धव सेना झाली संतप्त
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 28, 2025 18:21 IST2025-01-28T18:21:03+5:302025-01-28T18:21:16+5:30
मुंबई-उद्धव सेनेच्या उपनेत्या व महिला विभागसंघटक राजुल पटेल यांनी काल दुपारी शिंदे सेनेत प्रवेश केला.त्यामुळे वर्सोव्यातील उद्धव सेना संतप्त झाली ...

राजुल पटेल यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने वर्सोव्यातील उद्धव सेना झाली संतप्त
मुंबई-उद्धव सेनेच्या उपनेत्या व महिला विभागसंघटक राजुल पटेल यांनी काल दुपारी शिंदे सेनेत प्रवेश केला.त्यामुळे वर्सोव्यातील उद्धव सेना संतप्त झाली आहे.काल रात्री एका सामान्य स्त्रीला शिवसेना पक्षामुळे एव्हढे वैभव प्राप्त झाले असतांना पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाताना कसलाही खेद राजूल पटेल वाटला नाही. याबद्दल जोगेश्वरी पश्चिम,बेहराम बाग, काजूपाडा उद्धव सेनेच्या शाखेबाहेर उपस्थित शिवसैनिकांनी तीव्र शब्दात उद्धव सेनेचे नेते,आमदार व विभागप्रमुख अँड. अनिल परब यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
१९९२ पासून ते २०१९ पर्यंत सतत शिवसेनेच्या पक्षाकडून महापालिका व विधानसभेसाठी उमेदवारी
२०१९ ला वर्सोवातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यांनी अपक्ष लढणाऱ्या राजूल पटेल यांच्या मागे ठामपणे उभे राहून ३२३०० मते मिळवून दिली होती. १९९७ ते २०१२ पर्यंत नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्ष अशी पदे पक्षातील नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या जोरावर भोगली होती.२०१७ मध्ये पुन्हा त्याच प्रभागातून शिवसेनेने उमेदवारी दिली. व त्या पुन्हा ४ थ्यांदा नगरसेविका झाल्या. या टर्म मध्ये त्यांना आरोग्य समितीचे अध्यक्षपद ही पक्षाने दिले होते या शब्दात शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
२००६ मध्ये एका कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवर शिवसेनेची ओशिवरा काजू पाडा शाखा महापालिकेने तोडली होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत विभागप्रमुख अँड. अनिल परब यांच्यासह अनेक शिवसैनिकांना पोलीसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागले. शिवसेना शाखा तोडताना अनेक महिला व पुरूष शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले होते. आमदार अनिल परब यांनी उपस्थित शिवसैनिकांसोबत झालेल्या संवादात या आठवणी जाग्या केल्या व शिवसैनिकांचे रक्त सांडून मिळवलेल्या या शिवसेना शाखेवर शिंदे सेनेचा कब्जा कदापी होवू देणार नाही असे बजावले.तर राजुल पटेल यांचे गेली दोन वर्षे तळ्यात-मळ्यात सुरू होते अशी कुजबुज देखील येथील शिवसैनिकांमध्ये ऐकायला मिळाली.