Join us

आदित्य ठाकरेंचं मत अवैध ठरता ठरता वाचलं! ऐनवेळी घोळ लक्षात आला अन्...; नेमकं काय घडलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 1:46 PM

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान सुरू असून महाराष्ट्रातील सहा जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

मुंबई-

राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान सुरू असून महाराष्ट्रातील सहा जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरवेळी बिनविरोध होणारी राज्यसभेची निवडणूक यंदा मतदानातून होत असल्यानं सर्वाचं या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. त्यात अतिरिक्त उमेदवारांमुळे निवडणूक रंगतदार झाली आहे. एक एक मत प्रत्येक पक्षासाठी महत्वाचं झालं आहे. तसंच आपण केलेलं मतदान अवैध ठरणार नाही आणि पक्षावर नामुष्की ओढवणार नाही याचीही काळजी आमदारांनी घेतली आहे. निवडणुकीबाबतचे प्रशिक्षणही प्रत्येक पक्षाच्यावतीनं आमदारांसाठी ठेवण्यात आलं होतं. पण आज शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरच त्यांनी केलेलं मतदान अवैध ठरण्याची नामुष्की ओढावली असती. पण वेळीच घोळ लक्षात आला आणि आदित्य ठाकरेंना मतदान करता आलं. 

नेमकं काय घडलं?राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचं मतदान करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज विधानभवनात पोहोचले. पण ते जेव्हा आपलं मत नोंदवणार होते त्याचवेळी त्यांना देण्यात आलेल्या मतपत्रिकेवच चक्क निवडणूक आयोगाचा शिक्काच नाही असं लक्षात आलं. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घेत तातडीनं संबंधित मतपत्रिका बाजूला ठेवून आदित्य ठाकरे यांना निवडणूक आयोगाचा शिक्का असलेली मतपत्रिका देण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपलं मत नोंदवलं आणि ते बाहेर पडले. 

उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; राज्यसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?, राज्याचं लक्ष

आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाचा शिक्का नसलेल्या मतपत्रिकेवर आपलं मत नोंदवलं असतं. तर मतमोजणीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्काच नसल्यामुळे मत बाद ठरविण्यात आलं असतं. त्यामुळे शिवसेनेचं एक महत्वाचं मत अवैध ठरलं असतं आणि मोठी नामुष्की पक्षावर ओढावली असती. आता इतक्या चुरशीच्या लढाईत निवडणूक मतपत्रिकेवर आयोगाचा शिक्काच नसणं असा घोळ नेमका कसा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच निवडणूक आयोगाचा शिक्का नसलेली मतपत्रिका तिथं कुणी ठेवली? याची निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेराज्यसभानिवडणूकशिवसेना