Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:49 AM2022-06-10T07:49:46+5:302022-06-10T07:50:14+5:30
एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई- राज्यसभेच्या सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक आज (१० जून) रोजी होत असून महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. सात उमेदवार रिंगणात असल्याने पत्ता कोणाचा कट होणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची घडामोड घडली आहे.
एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामं होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली होती. त्यानंतर आज इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
To defeat BJP, our party AIMIM has decided to vote for Maha Vikas Aghadi (MVA) in the Rajya Sabha elections in Maharashtra. Our 2 AIMIM Maharashtra MLAs have been asked to vote for the Congress candidate Imran Pratapgarhi: Imtiaz Jaleel, AIMIM Maharashtra president pic.twitter.com/avKeuj88dG
— ANI (@ANI) June 10, 2022
दरम्यान, आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद ठरू नये म्हणून प्रत्येक पक्ष डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत आहे. कशा पद्धतीने मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीची मते देताना काय काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगत मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.
रिंगणातील उमेदवार-
भाजपा: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक
शिवसेना: संजय राऊत आणि संजय पवार
राष्ट्रवादी: प्रफुल्ल पटेल
काँग्रेस: इम्रान प्रतापगडी