Rajya Sabha Election 2022: भाजपाची सगळी गणितं जुळली; तीनही जागा निवडून येणार, गिरीश महाजन यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 08:26 AM2022-06-10T08:26:22+5:302022-06-10T08:31:13+5:30
Rajya Sabha Election 2022: भाजपाचा शंभर टक्के विजय होणार आहे, असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मुंबई- राज्यसभेच्या सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक आज (१० जून) रोजी होत असून महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. सात उमेदवार रिंगणात असल्याने पत्ता कोणाचा कट होणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत भाजपाच्या तीनही जागा निवडून येणार, असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाची सगळी गणितं जुळली आहेत, अशी माहितीही गिरीश महाजन यांनी दिली. तसेच आमदारांना सर्व सूचना दिलेल्या आहेत, ते त्याचे पालन करतील. तसेच भाजपाचा शंभर टक्के विजय होणार आहे, असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तत्पूर्वी, आज सकाळीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्षाचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
दरम्यान, आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद ठरू नये म्हणून प्रत्येक पक्ष डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत आहे. कशा पद्धतीने मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीची मते देताना काय काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगत मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.
रिंगणातील उमेदवार-
भाजपा: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक
शिवसेना: संजय राऊत आणि संजय पवार
राष्ट्रवादी: प्रफुल्ल पटेल
काँग्रेस: इम्रान प्रतापगडी