Join us

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेचे आमदार हॉटेलमध्ये जाताच घडली मोठी घडामोड; भाजपाचे संकटमोचक लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 10:39 AM

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.

मुंबई/वसई- राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने छोटे पक्ष तसेच अपक्षांच्या मताला मोठी किंमत आलेली आहे. तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीला यात विशेष महत्त्व आले असून, महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. 

भाजपाच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. मग शिवसेनेच्या शिष्टमंडळाने देखील हितेंद्र ठाकूर यांची विरारमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता पुन्हा संकटमोचक म्हणून ओळख असणारे भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची रात्री भेट घेतली. 

महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार

हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची पालघरमध्ये पकड आहे. सध्या त्यांच्याकडे तीन आमदार आहेत. त्यामुळे भाजपाचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनीही हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत, राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याचे सांगण्यात येत आहे. गिरीश महाजन यांनी याआधीही भाजपच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या मुंबईतील आमदारांची जबाबदारी प्रामुख्याने शेलार आणि लाड सांभाळत आहेत. 

महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्वच पक्षांच्या हालचालींना या निवडणुकीमुळे वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत येऊन राहण्याचे आदेश दिले आहेत. तर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर सर्व गणित अवलंबून असल्याने मोठ्या पक्षांकडून त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे.

कोरोनाबाधित आमदारांचे मतदान कसे घ्यायचे? निवडणूक आयोगाला पत्र

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागेसाठी राज्यात चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने २ उमेदवार उतरवले आहेत. शिवसेना आमदारांची बैठक झाल्यानंतर आता भाजपाच्या आमदारांची ८ तारखेला बैठक होणार आहे. तर मंगळवारी काँग्रेस आमदारांचीही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला येताना बॅगा घेऊन या अशी सूचना काँग्रेसच्या आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष आमदार फुटू नये यासाठी खबरदारी घेत आहेत. 

‘ईडी’चा दबाव नाही!

‘ईडी’ची भीती दाखवून आमदार हितेंद्र ठाकूर यांना भाजप आपल्या बाजूने करेल, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेलाही ठाकूर यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘माझ्यावर ईडी वगैरे कुणाचा दबाव नाही. कुणावर तसा दबाव असेल तर मला माहीत नाही, पण माझ्यावर तरी अद्याप तसा दबाव नाही. भविष्यातही असे कुणी उपद्व्याप करणार नाही, याची मला खात्री आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा दबावांना घाबरणारे आम्ही नाही,’ असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :हितेंद्र ठाकूरगिरीश महाजनराज्यसभाभाजपा