मुंबई-
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात आतापर्यंत राष्ट्रवादीच्या २० आमदारांनी, भाजपाचा २० तर काँग्रेसच्या १० आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे आमदार देखील नुकतेच ट्रायडंट हॉटेलमधून विधानभवनात मतदानासाठी पोहोचले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक अतिरिक्त उमेदवार उभा केल्यानं चुरशीची झाली आहे. त्यामुळे एक एक मत प्रत्येक पक्षासाठी अतिशय महत्वाचं आहे. यातच प्रकृती अस्वास्थ्य असतानाही आमदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवनात दाखल होत आहेत.
पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक कर्करोगाशी झुंज देत आहेत. गंभीर आजाराचा सामना करत असतानाही मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात मतदानासाठी पोहोचल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप देखील गंभीर आजारानं ग्रस्त आहेत. पण आपले आमदार रणांगणाबाहेर राहू नयेत याची काळजी दोन्ही बाजूकडून घेतली आहेत. लक्ष्मण जगताप देखील अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात मतदानासाठी पोहोचत आहेत. लक्ष्मण जगताप आधी एअर अॅम्ब्युलन्सनं पुण्याहून मुंबईत पोहोचणार होते. पण ढगाळ वातावरणामुळे उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर लक्ष्मण जगताप पिंपरी ते मुंबई असा अॅम्ब्युलन्समधून प्रवास करत आहेत.
"आघाडी सरकारमधील एक संजय जाणार", भाजप नेते अनिल बोंडे यांचे सूचक विधान
समोर आलेल्या माहितीनुसार मतदानाच्या पहिल्या दिड तासात जवळपास ५० टक्के मतदान पूर्ण झालं आहे. राष्ट्रवादीचे उर्वरित आमदार हायकोर्टाकडून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या याचिकेवरील निकालानंतर मतदान करणार असल्याचं समोर येत आहे. हायकोर्टाकडून नेमका काय निर्णय देण्यात येतो हे पाहिल्यानंतर राष्ट्रवादीकडून पुढील रणनिती आखली जाईल आणि उर्वरित आमदार त्यानुसार मतदान करतील असं सांगितलं जात आहे.