मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या २० आमदारांनी, भाजपाच्या २० आमदारांनी, तर काँग्रेसच्या १० आमदारांनी आतापर्यंत मतदान केल्याची माहिती समोर येत आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला. मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी देखील मतदान केलं आहे.
सर्वांत पहिले राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदान करणार, त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मतदानाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सुनिल तटकरे आणि मंत्री जयंत पाटील, शिवसेनेकडून सुनिल प्रभू आणि काँग्रेसकडून मंत्री अशोक चव्हाण पोलिंग एजंट असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची घडामोड घडली आहे.
धोका नको म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाचा कोटा वाढवल्याची महिती समोर आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेना उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मतं कमी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची चिंता वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आज सकाळीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्षाचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
भाजपाची सगळी गणितं जुळली-
भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत भाजपाच्या तीनही जागा निवडून येणार, असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाची सगळी गणितं जुळली आहेत, अशी माहितीही गिरीश महाजन यांनी दिली. तसेच आमदारांना सर्व सूचना दिलेल्या आहेत, ते त्याचे पालन करतील. तसेच शंभर टक्के विजय भाजपाचाच होणार आहे, असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.