मुंबई: देशभरात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, एकेका मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंचे आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच महाविकास आघाडीतील अनेक आमदार ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray Govt) नाराज असल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडीच्या एका आमदाराबाबत साशंकता होती. मात्र, मिलिंद नार्वेकर यांनी एक फोन केला आणि आमदारांनी थेट मुंबई गाठत मतदानाला उपस्थिती लावली.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडत असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कोटा वाढवून शिवसेनेचा विजय सुकर करण्याबाबत रणनीति आखली आहे. मात्र, यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज आमदार दिलीप मोहिते पाटील मतदानाला येणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत होती. अशावेळी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थी करत दिलीप मोहिते पाटील यांना फोन केला आणि त्यांनी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न सुटलेले नाहीत, पण कुणावर तरी विश्वास ठेवावा लागेल
माझी नाराजी माझ्या मतदारसंघाविषयी आणि तेथील प्रश्नांविषयी होती. ते सोडवण्याची खात्री दिल्याने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. शेवटी सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतरच मुख्यमंत्री होत असतात. ते सगळ्या जनतेचे असतात. ज्या आमदारांच्या जीवावर सरकार चालते, त्यांचेच प्रश्न सुटणार नसतील तर आम्ही आमची भूमिका कोणाकडे मांडायची, असा सवाल दिलीप मोहिते-पाटील यांनी केला आहे. राज्याचे प्रमुख म्हणून माझी भूमिका त्यांना भेटून मांडलेली आहे. त्याचबरोबर माझ्या नेत्यांकडेही मांडली. माझी भूमिका स्पष्ट आहे. माझ्या वैयक्तिक प्रश्नांसाठी कधीही त्यांच्याकडे गेलेलो नाही आणि जाण्याचा प्रश्नही नाही. माझ्या तालुक्यात जे काही विषय होते, त्यासंदर्भात गेलो होतो. मात्र, माझे विषय सुटले नाहीत. जयंत पाटील आणि अजित पवार सांगतील, त्यांना मतदान करणार असल्याचे मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केले.
मिलिंद नार्वेकरांनी सर्व प्रश्न सोडवण्याची घेतली जबाबदारी
मिलिंद नार्वेकरांनी मला फोन केला. ते म्हणाले की, तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. आता कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. त्यानुसार मी तो ठेवला आहे. ते मला शंभर टक्के न्याय देतील, अशी मला खात्री आहे, असा विश्वास दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.