Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 08:07 AM2022-06-07T08:07:37+5:302022-06-07T08:07:46+5:30

निवडणुकीत शिवसेनेच्या २ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे.

Rajya Sabha Election 2022: On the occasion of Rajya Sabha elections, a meeting of all MLAs of Mahavikas Aghadi will be held today. | Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार

googlenewsNext

मुंबई- सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या गोटातील हालचालींना सोमवारी वेग आला. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार बॅगा घेऊन मुंबईत दाखल झाले असून, पुढील तीन दिवसांसाठी त्यांची सोय ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 

निवडणुकीत शिवसेनेच्या २ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे. सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व आमदारांना बसमधून हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. त्यानंतर आज सायंकाळी महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांची बैठक होणार आहे. मुंबईतील  ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना वांद्रे-कुर्ला संकुलात अशाच पद्धतीने तीनही पक्षांच्या आमदारांची बैठक झाली होती. त्यातून आपले संख्याबळ आघाडीने दाखवून दिले होते. अशाच पद्धतीचे शक्तीप्रदर्शन या बैठकीतून करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून २६ अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित १६ मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची २२ अतिरिक्त मतं असून, अन्य ७ आमदारांचा पाठिंबा धरता एकूण २९ मते आहेत. उर्वरित १३ मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे. 

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पत्ते गुलदस्त्यात-

तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी महाविकास आघाडीसह भाजपही करत आहे. वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून घोडेबाजार, पटोले यांचा आरोप-

भाजपने कितीही घोडेबाजार केला, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कितीही केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकतील. - नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Rajya Sabha Election 2022: On the occasion of Rajya Sabha elections, a meeting of all MLAs of Mahavikas Aghadi will be held today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.