Join us

रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 7:30 AM

Rajya Sabha Election 2022: धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. 

मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) बाजी मारली. मात्र शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. 

राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. 

महाविकास आघाडीची ९ मते फुटली; देवेंद्र फडणवीसांची‌ खेळी यशस्वी ‌ठरली 

दिवसभर सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर रात्री नेमकं काय-काय घडलं, पाहा...

- सकाळी सुरु झालेलं राज्यसभेसाठीचं मतदान सायंकाळी ४ वाजता पूर्ण झालं. राज्यातील २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

- भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली.

- महाविकास आघाडी सरकाकडूनही भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवण्यात आला. मुनगंटीवारांनी मतपत्रिका हातात दिल्याने काँग्रसेचे आमदार अमर राजूकर यांनी आक्षेप नोंदवला. अपक्ष आमदार रवी राणांच्या मतदानावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आणि महाविकास आघाडीने देखील दोघांची मते बाद करण्याची मागणी केली.

"लोकशाहीची निखळ थट्टा करण्याची कधीही न संपणारी गाथा पाहिली...", जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा

- भाजपा आणि महाविकास आघाडीने  राज्यसभा निवडणुकील काही आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली.

- पक्षांच्या परस्पर आरोपांवरती केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

-अखेरीस ७-८ तासांच्या प्रतिक्षेनंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद केले.

- यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या आणि सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा या भाजपच्या आमदारांचे मत वैध असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. 

- सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद केल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. 

- २८४ मतं  निवडणूक आयोगाने वैध ठरवली.

- राज्यसभेसाठी पहिल्या पसंतीची मतं घेऊन प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पीयुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी झाले. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात लढत सुरू अखेरपर्यंत सुरु राहिली. 

- पीयूष गोयल यांना ४८ मते मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही ४८ मते मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची २७ मते ही धनंजय महाडिक यांना मिळाली. तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली. 

-  मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.  तर संजय पवार यांना ३३ मतांवरच समाधान मानावं लागलं.

- भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे.

- भाजपाच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, अशी पहिली प्रतिक्रिया दिली.

- भारतीय जनता पक्षाने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे, असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :राज्यसभानिवडणूकमहाराष्ट्र विकास आघाडीभाजपामहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशरद पवार