Rajya Sabha Election 2022: अबू आझमी अन् रईस शेख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांचीही उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 04:09 PM2022-06-08T16:09:37+5:302022-06-08T16:10:01+5:30

Rajya Sabha Election 2022: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत.

Rajya Sabha Election 2022: Samajwadi Party MLAs Abu Azmi and Rais Shaikh have gone to meet Chief Minister Uddhav Thackeray. | Rajya Sabha Election 2022: अबू आझमी अन् रईस शेख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांचीही उपस्थिती

Rajya Sabha Election 2022: अबू आझमी अन् रईस शेख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांचीही उपस्थिती

Next

मुंबई- कोणी कितीही प्रयत्न केले तरी राज्यसभेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडी जिंकणारच, त्यानंतर जल्लोषासाठी पुन्हा एकत्र येऊ, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत १३ अपक्ष वा लहान पक्षांचे आमदार बैठकीला उपस्थित होते. कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, संजयमामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले आणि विनोद अग्रवाल देखील उपस्थित होते.

समाजवादी पार्टीचे आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार मात्र महाविकास आघाडीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीला गैहजर राहिले. मात्र आज समाजवादी पार्टीचे दोन्ही आमदार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले आहेत. अबू आझमी आणि रईस शेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासोबत वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरे समाजवादी पार्टीची नाराजी दूर करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीतील तसेच समर्थित अपक्ष आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याची दखल मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनीही त्यांच्या भाषणातून घेतली. या निवडणुकीनंतर सगळ्यांना घेऊन बसा आणि सगळ्यांचे समाधान करा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीनंतर या विषयी तातडीने बैठका घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

शिवसेनेकडून आमदारांना व्हिप- 

आज शिवसेनेने व्हिप जारी केला आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करावयाचे आहे, असं व्हिपमध्ये सांगण्यात आलं आहे. राज्यसभेचे निवडणूकीचे मतदान शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. 

सदर निवडणूकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवार १० जून २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरिता सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे, आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे, असं शिवसेनेकडून जारी करण्यात आलेल्या व्हिपमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: Rajya Sabha Election 2022: Samajwadi Party MLAs Abu Azmi and Rais Shaikh have gone to meet Chief Minister Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.