Rajya Sabha Election 2022: शिवसेनेकडून आमदारांना व्हिप; महत्वाचे दिले आदेश, पत्रकात नेमकं काय म्हटलंय, पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 10:52 AM2022-06-08T10:52:17+5:302022-06-08T11:01:58+5:30
शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे.
मुंबई- कोणी कितीही प्रयत्न केले तरी राज्यसभेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडी जिंकणारच, त्यानंतर जल्लोषासाठी पुन्हा एकत्र येऊ, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले.
महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची मंगळवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. त्यानंतर आज शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करावयाचे आहे, असं व्हिपमध्ये सांगण्यात आलं आहे.
राज्यसभा निवडणूकीचे मतदान शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. सदर निवडणूकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवार १० जून २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरिता सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे, आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे, असं शिवसेनेकडून जारी करण्यात आलेल्या व्हिपमध्ये म्हटलं आहे.
मुंबई- शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करावयाचे आहे, असं व्हिपमध्ये सांगण्यात आलं आहे. pic.twitter.com/MJuJ044nud
— Lokmat (@lokmat) June 8, 2022
दरम्यान, महाविकास आघाडीतील तसेच समर्थित अपक्ष आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याची दखल मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनीही त्यांच्या भाषणातून घेतली. या निवडणुकीनंतर सगळ्यांना घेऊन बसा आणि सगळ्यांचे समाधान करा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीनंतर या विषयी तातडीने बैठका घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बैठकीला उपस्थित अपक्ष व लहान पक्षांचे आमदार-
कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, संजयमामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल असे १३ अपक्ष वा लहान पक्षांचे आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते.