Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात, राज्याचं लागलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:41 PM2022-06-10T15:41:19+5:302022-06-10T15:56:17+5:30
राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८५ आमदारांनी मतदान केलं आहे.
मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सायंकाळी ४ वाजता म्हणजे थोड्याच वेळात आता मतमोजणी सुरू होणार आहे.
#UPDATE | Maharashtra: 285 MLAs have cast their votes till 3.30pm in the #RajyaSabhaElection2022
— ANI (@ANI) June 10, 2022
कोठडीत असेलेल्या राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची मतदान करण्याची शक्यता मावळली आहे. पोलीस संरक्षणात मतदानासाठी जाण्याची परवानगी मागणारी याचिका केली होती. मात्र, त्यावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोघांच्या मतदानाची शक्यता धूसर झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील विधानभवनात दाखल झाले होते. आज संध्याकाळपर्यंत निवडणुकीच्या निकालाबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सात उमेदवारांपैकी कोणत्या एका उमेदवाराचा पत्ता कट होणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, एक-एक मत प्रत्येक पक्षासाठी महत्वाचं झालं आहे. तसंच आपण केलेलं मतदान अवैध ठरणार नाही आणि पक्षावर नामुष्की ओढवणार नाही, याचीही काळजी आमदारांनी घेतली आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतावर भाजपाचे नेते आशिष शेलार आणि नेते पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता. मात्र स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपाने घेतलेला आक्षेप फेटाळून लावला आहे.
रिंगणातील उमेदवार
भाजप: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक
शिवसेना: संजय राऊत आणि संजय पवार
राष्ट्रवादी: प्रफुल्ल पटेल
काँग्रेस: इम्रान प्रतापगडी