Join us

प्रफुल्ल पटेलांना 'धूर्त' म्हणत रोहित पवारांनी सांगितलं राज'कारण'; राष्ट्रवादीचाही खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 9:32 AM

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील तीन जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत.

मुंबई - भाजप, शिवसेना आणि काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला राज्यसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, प्रफुल्ल पटेलांचा राज्यसभेचा अद्याप ३ वर्षे कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे, पक्षाच्या या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता, राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजेच अजित पवारांनी असा निर्णय का घेतला, यावर रोहित पवारांनी भाष्य केलंय. तसेच, प्रफुल्ल पटेल यांना धूर्त संबोधत बोचरी टीकाही केली. 

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील तीन जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. राष्ट्रवादी वगळता तीन पक्षांनी यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे अजित पवार गटाकडून कुणाला संधी दिली जाणार? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. अखेर, रात्री उशिरा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर झाले. मात्र, पटेल यांच्या उमेदवारीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका करत, अजित पवारांच्या या निर्णयामागील कारणही सांगितलं आहे. 

''लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सहकाऱ्यांची ‘राजकीय उपयुक्तता’ संपणार असल्याने भाजपा नव्या सहकाऱ्यांना अलगद बाजूला फेकेल हा अंदाज कदाचित ‘निवडणूक आयोगाद्वारा नियुक्त’ झालेल्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांना आला नसला तरी प्रफुल पटेल यांनी ही बाब अत्यंत अचूकपणे हेरलीय. यातूनच भविष्यातला संभाव्य धोका टाळत त्यांनी आपली राज्यसभेची टर्म धूर्तपणे अजून दोन वर्षांनी वाढवून घेतलेली दिसतेय,'' असे रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचा धूर्त असा उल्लेख करत अजित पवारांनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या निवडीबद्दल रोहित पवार यांनी त्याचं अभिनंदनही केले, व भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र, रोहित पवार यांना अजित पवार गटानेही प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आपली पात्रता आहे का?, असा टोला लगावला. 

 

''स्वतः आजोबांच्या नावावर आणि राहुल गांधींचं अनुकरण (अंधानुकरण) करून राजकारणात दुडदुडती पावलं टाकत असताना ज्येष्ठ नेत्यांच्या धोरणांबद्दल बोलण्याची आपली पात्रता आहे का, हे आधी तपासून पाहिलं पाहिजे. उरल्यासुरल्या पक्षातल्या माणसांनाही मान देऊन सांभाळता येत नाही त्यांनी इतरांना सल्ले देऊ नयेत.'', असा पलटवार सारंग यांनी केला आहे. 

प्रफुल्ल पटेल देणार राजीनामा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल निवडून आल्यानंतर आपल्या आधीच्या सदस्यपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर, मे महिन्यात पटेलांच्या आधीच्या टर्मसाठी पोटनिवडणूक होईल, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. दरम्यान, या पदासाठी पक्षातून अनेकजण इच्छूक होते. इतर कुणाला उमेदवारी दिली असती, तर पक्षात नाराजी पसरण्याची शक्यता होती, त्यामुळेच हा असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारप्रफुल्ल पटेलरोहित पवार