मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येतील.
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ मार्च आहे. काँग्रेसने अद्याप त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपने बुधवारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपचे तिसरे उमेदवार ठरलेले नसले तरी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रदेश भाजपने खडसे यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे दिल्लीत पाठविले आहे पण श्रेष्ठींनी त्यावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेशरद पवार यांनी अर्ज भरला असला तरी दुसऱ्या जागेसाठी माजी राज्यमंत्री फौजिया खान यांनी त्यांच्यासोबत आज अर्ज भरला नाही. कारण, काँग्रेसनेही दोन जागांचा आग्रह धरलेला आहे. पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की तीन पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत त्या बाबतचा निर्णय बुधवारी रात्री वा गुरुवारी सकाळी घेतला जाईल. सूत्रांनी सांगितले की काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीलाच आणखी एक जागा दिली जाईल. फौजिया खान या गुरुवारी अर्ज भरतील.
शिवसेनेत खैरे की चतुर्वेदी यावर वाद असल्याची चर्चाशिवसेनेतर्फे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी या दोनपैकी एकास संधी दिली जाईल. शिवसेनेत वर्षानुवर्षे काम करणाºया नेत्यांनी खैरे यांच्या नावाचा आग्रह धरला असल्याचे म्हटले जाते. मात्र, ‘नव्या पिढीला नवा चेहरा हवा आहे, बघू! काय होते’ अशी प्रतिक्रिया नाव न देण्याच्या अटीवर शिवसेनेच्या एका नेत्याने दिली. याचा अर्थ खैरे की चतुर्वेदी यावर पक्षातील नव्याजुन्या पिढीत मतभेद असल्याचे मानले जात आहे.शरद पवारांचा अर्जराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज्यसभेसाठी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री आदी उपस्थित होते. पवार हे दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून जात आहेत.