Join us

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या जागेसाठी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान; ७ वाजता निकाल लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 10:54 PM

या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज म्हणजे १० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपाचे पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक यांनी अर्ज भरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे इमरान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार मैदानात आहेत. 

आज दिनांक १० जून २०२२ रोजी राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे २८८ सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि २ आमदार कोठडीत असल्याने एकूण २८५ मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करतील. 

या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत आहे. भाजपाचे २ उमेदवार सहज निवडून येतील इतका मतांचा कोटा पक्षाकडे आहे. परंतु तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी जादाची १५ मते भाजपाला आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीकडे चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठीही जादाची मते गरजेची आहेत. त्यामुळे अपक्ष आणि घटक पक्षांवर उमेदवारांचे भवितव्य आहे. 

यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे, तर भाजपाकडे दोन जागांसाठी पुरेसे आमदार आहेत. राज्यसभेवर उमेदवार पाठवण्याइतपत संख्याबळ शिवसेनेकडेही आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपा आपला तिसरा आणि शिवसेना आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रात राज्यसभेसाठी मतदान घ्यावं लागणार असल्याने या निवडणुकीसाठीची चुरस वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान हे इतर मतदानाप्रमाणे नसतं. तर त्यासाठी खूप काळजीपूर्वक मतदान करावं लागतं. या मतदान प्रक्रियेमध्ये थोडीशी जरी चूक झाली तर जय पराजयाचं चित्र बदलू शकतं. 

टॅग्स :राज्यसभाशिवसेनाभाजपा