संजय राऊतांमुळे 'मविआ'चं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:34 PM2022-06-13T19:34:16+5:302022-06-13T19:34:49+5:30
सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. संजय पवार यांचा पराभव कसा झाला? याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली
मुंबई - राज्यसभा निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. संख्याबळ नसताना भाजपाचा तिसरा उमेदवार काही मविआ समर्थक अपक्ष आणि घटक पक्षाच्या आमदारांच्या मतांवर निवडून आला. त्यामुळे कुणाची मते फुटली अशी चर्चा मविआ नेत्यांमध्ये सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या मतांच्या फुटीवरून शरद पवारही(Sharad Pawar) नाराज आहेत. राज्यसभेच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली.
सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. संजय पवार यांचा पराभव कसा झाला? याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी माध्यमातून अपक्ष आमदारांची नावे घेतली. त्यामुळे या आमदारांवर अविश्वास असल्याचं प्रखरतेने समोर आले असं नेते म्हणाले.
तसेच आमदार देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे या अपक्षांनी संजय राऊत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. काही दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक येऊन ठेपली आहे अशावेळी राऊतांनी केलेले हे विधान कितपत योग्य आहे असा सवाल नेत्यांनी उपस्थित केला. या विधानामुळे मविआच्या इतर आमदारांवरही त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो आणि विधान परिषदेत त्याचा फटकाही बसू शकतो अशी भीती राष्ट्रवादी नेत्यांनी बैठकीत वर्तवली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. अपक्ष उमेदवारांनी आम्हाला शब्द देऊन मतदान केलं नाही. सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे असं संजय राऊत म्हणाले. तसेच संजय पवार यांच्या पराभवानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला होता.