Join us

मंकीपॉक्समुळे आरोग्य यंत्रणा सतर्क, सात रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 10:00 AM

सात रुग्णांचा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह; संशयित रुग्णांचे करणार विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मंकीपॉक्स आजाराच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, विविध ठिकाणी संशयित रुग्णांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. 

या प्रक्रियेचाच भाग म्हणून राज्याच्या विविध भागांतून संशयित रुग्णांचे सात नमुने घेण्यात आले होते. नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या सातही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, कल्याण आणि डोंबिवली या शहरांमधून हे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. मंकीपॉक्सची लक्षणे एखाद्या व्यक्तीस आढळल्यास चाचणी केली जाते. त्याचा अहवाल येईपर्यंत संशयित रुग्णाला विलगीकरणात ठेवले जाते.

राज्याच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश     दिले आहेत. त्याचप्रमणे ज्या  ठिकाणी या आजारासदृश्य काही नागरिकांमध्ये आढळल्यास त्यांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणीस पाठवावे, अशा सूचना दिल्या आहेत. राज्यातील काही भागातून संशयित रुग्णाचे नमुने गोळा केले असून, प्रयोगशाळेतील तपासणीअंती सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.  - डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य विभाग.

ही काळजी घ्या... मंकीपॉक्सपासून बचावासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्रथम बाधित व्यक्तीची माहिती आरोग्य केंद्रात द्या, बाधित व्यक्तीला मास्कने तोंड आणि नाक झाकायला लावणे, शरीरावर जखमा असल्यास स्वच्छ कपड्याने झाकून घेणे.रुग्ण वापरत असलेले बेडशीट, टॉवेल्स, या गोष्टीचा वापर टाळा, साबण, पाणी वापरून हात स्वच्छ ठेवा किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. ही मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य विभागाने जाहीर केली आहेत. 

 

टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्यामाकड