Rajyasabha: मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 03:36 PM2022-06-08T15:36:53+5:302022-06-08T15:41:02+5:30
महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची मंगळवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली
मुंबई - कोणी कितीही प्रयत्न केले तरी राज्यसभेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडी जिंकणारच, त्यानंतर जल्लोषासाठी पुन्हा एकत्र येऊ, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले. तर, दुसरीकडे भाजपही राज्यसभा निवडणुकीत आपलेच उमेदवार विजयी होतील, असे ठामपणे सांगत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अॅड. आशिष शेलार यांनी मनसेप्रमुखराज ठाकरेंची भेट घेतली.
महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची मंगळवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. त्यानंतर आज शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी मतदानांसदर्भात व्हिप जारी केला आहे. दुसरीकडे आशिष शेलार यांनी मनसे आमदाराच्या एका मतासाठी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेचं मत भाजपलाच मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी तसा निर्णय जाहीर केल्याचंही शेलार म्हणाले.
मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मनसेचं एक मत भाजपला देण्याची विनंती यावेळी राज यांच्याकडे केली. त्यावर, तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी मनसेच्या आमदाराचं एक मत भाजपला देण्याचं जाहीर केल्याची माहिती भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी दिली. विशेष म्हणजे या भेटीवेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेही उपस्थित होते, असेही ते म्हणाले.
मनसेच्या पाठिंब्यामुळे आता भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग आणखी सोपा होईल. त्यामुळे, राज ठाकरेंच्या या सहकार्याबद्दल आपण भाजपच्यावतीने त्यांचे आभार मानतो. या निवडणुकीत भाजपचे उमेदवारच निवडून येतील, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.
शिवसेनेकडून व्हीप जारी
राज्यसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. सदर निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवार १० जून २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरिता सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे, आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे, असं शिवसेनेकडून जारी करण्यात आलेल्या व्हिपमध्ये म्हटलं आहे.