मुंबई : धारावीत बनलेली राखी संपूर्ण भारतात विक्रीसाठी जाते. यंदा राखीला कुठलाच व्यापारी खरेदी करण्यास तयार नसल्याने राखी उत्पादकांवर मोठे संकट ओढवले आहे. राखी उत्पादक मिश्रीलाल पाटवा सांगतात की, माझा राखी बनविण्याचा जुना व्यवसाय आहे. माझ्याकडे महिला कामगार राखी बनविण्याचे काम करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राख्या बनवून तयार आहेत. मात्र त्या राख्या घेण्याकरिता अजून कोणताच व्यापारी फिरकलेला नाही.
व्यावसायिक विकास पाटवा म्हणाले, धारावीतील राखी ही होलसेल दरात पन्नास पैसे ते पाच रुपये नग या दरात विकली जाते. राखीच्या डिझाईनवरून हे दर ठरविले जातात. देशभरातून व्यापारी एका उत्पादकाकडून ५०० नग ते १५ हजार नग एवढ्या राख्या विकत घेतात. अशा प्रकारे धारावीतील एका व्यापाऱ्याकडून किमान ५० हजार ते १ लाखांपर्यंत राख्या विकल्या जातात. यामुळे एका व्यापाºयाची दरवर्षी किमान १ ते २ लाखांची उलाढाल या व्यवसायातून होते. मात्र या वर्षी एका व्यापाºयाला केवळ पंधरा हजार रुपयाच्या राख्यांची आॅर्डर आली आहे.