मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राखी जाधव (Rakhi Jadhav) यांची मुंबई अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या आधीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या जागी राखी जाधव यांची वर्णी लागली आहे. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे शरद पवार गटाकडून ही नियुक्ती करण्यात आली. याआधी अजित पवार गटाकडून समीर भुजबळ यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून संघटना बांधणीकडे लक्ष दिले जात आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर भर देण्यात येत आहे. आपल्या गटाकडे ताकदवान पदाधिकारी खेचण्याची स्पर्धा या दोन्ही गटांत लागली आहे. अजित पवार गटाने मुंबईची धुरा समीर भुजबळांकडे दिली आहे. तर नबाव मलिक यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा अतिरिक्त भार हा महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली. त्यामुळे अखेर त्यांना याचे फळ मिळाले आहे. आता शरद पवार गटाकडून राखी जाधव यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत. राखी जाधव घाटकोपरमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या त्या जवळच्या मानल्या जातात. दरम्यान, नवाब मलिक हे जामीनावर बाहेर आले असले तरी त्यांची भूमिका स्पष्ट नव्हती. ते अजित पवार गटाला साथ देणार असल्याचीही चर्चा होती. पण नवाब मलिकांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.