धागा रक्षणाचा... धारावीमध्ये यंदा बनणार ७५ लाख राख्या! ५ कोटींची उलाढाल अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 09:03 AM2024-07-31T09:03:19+5:302024-07-31T09:03:52+5:30
राखी गल्ली सजली; पटवा समाज देशभरात पाठवतो राख्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : श्रावण महिन्याची सुरुवात सणांनी होते. बहीण-भावाच्या नात्यात रक्षाबंधनाला महत्त्व आहे. त्यामुळे राखीची खरेदी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. धारावीतील राखी गल्लीमध्ये ७५ लाख राख्यांची निर्मिती होण्याची अपेक्षा येथील पटवा राखी उत्पादकांना आहे. यावेळी व्यवसायाची उलाढाल ५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी दिवाळीपासून राखी बनवण्याच्या कामास सुरुवात होऊन रक्षाबंधनाच्या एक महिना आधी राख्या विक्रीसाठी उपलब्ध होतात.
धारावीमधील राखी गल्लीमध्ये राख्यांचे ५० कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये ७ ते ८ स्त्री-पुरुष कारागीर दिवाळीपासून राखी बनवण्यास सुरुवात करतात. धारावीमधील पाचशे कुटुंबे वर्षभर हे काम करतात. राखी पौर्णिमेसाठी नव्या राखीचे डिझाइन साधारणपणे नोव्हेंबरमध्ये निश्चित करण्यात येते. त्यानंतर पुढच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अशा राख्या तयार करण्यात येतात. चित्रपट, कार्टुन्सचा प्रभाव राख्यांच्या डिझाइनवर असतो, असे पटवा यांनी सांगितले. एका रुपयाची राखीही राखी गल्लीत आहे. घाऊक बाजारात सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातील राख्या तयार होतात. पुढे या राख्यांची किंमत किरकोळ बाजारात वाढते. राखीची जास्तीत जास्त किंमत २५ रुपये आहे. कुंदन आणि मेटलच्या राखीची किंमत इथे १०० रुपये आणि घड्याळाच्या राखीची किंमत ६५ रुपये आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप हवा तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बाजारपेठ अतिशय संथ आहे. गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस कोसळत असल्याने मुंबई बाहेरील शहरातील घाऊक व्यापारी अजून मुंबईमध्ये खरेदीसाठी आले नाहीत. त्याचा परिणाम यंदाच्या बाजारपेठेवर झाला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांचे खरेदीचे प्रमाण आत्तापर्यंत केवळ १० ते १५ टक्के आहे. - मुन्नालाल पटवा, राखी कारागीर, राखी गल्ली.
कच्च्या मालाच्या किमतीमध्ये यावर्षी वाढ झालेली नाही. यंदा राख्यांच्या किमतींमध्ये काहीच बदल झालेला नसून गेल्या वर्षीचे दर कायम ठेवले आहेत. मागणीमध्ये कमी झाल्याने मागील वर्षी अपेक्षित व्यवसाय झाला नाही. आता मुंबईमध्ये अनेक छोटे -मोठे व्यावसायिक राखी उत्पादन करत आहेत. त्यामुळे आमच्याकडील मागणीमध्ये घट झाली आहे. - चंद्रशेखर पटवा, राखी उत्पादक, धारावी.