मुंबई/जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटातून आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या फुटीपासून शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवार गटाचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. आमदार रोहित पवार सातत्याने भाजपला लक्ष्य करताना दिसतात, मात्र जळगावधील सभेत बोलताना त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. यावेळी, मराठा आरक्षणावर भाष्य केलं. आता, जळगावमधूनच रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय.
अजित पवार गट शरद पवार यांचा फोटो वापरतात, कारण त्यांना माहित आहे की, साहेबांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. ज्यांना मंत्रिपदे मिळाली, सत्तेत गेले, ते कदाचित साहेबांना विसरले असतील, पण अनेक आमदार हे साहेबांना विसरलेले नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही, अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत येऊ शकतात, असं रोहित पवार म्हणाले. तसेच, भाजपाने केवळ फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आमदार रोहित पवारांच्या टीकेला खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
राष्ट्रवादीने काय केलंय? त्यांचा आघाडीतील पक्ष हा काँग्रेस होता, शिवसेना नव्हता. मग, त्यांनी शिवसेनेसोबत जाऊन आघाडी करुन सरकार स्थापन केलंच होतं ना, मग आम्ही वेगळं केलं त्यात काय, असे प्रत्युत्तर रक्षा खडसे यांनी दिलंय. रोहित पवारांना यापूर्वी कधी जळगाव जिल्हा दिसला नाही, याआधी ते कधी आले नाहीत, आता ते कसे आले? आता त्यांना का गरज वाटू लागली, असा सवालही रक्षा खडसे यांनी विचारला आहे.
मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणाले...
कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता, सरकारने मराठा आणि धनगर समजाला आरक्षण देण्याची हिंमत दाखवावी. तीन छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल त्यांच्या दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी. केंद्राच्या अधिवेशनात धनगर समाजाचा तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुद्दा जर हे त्रिकूट सरकार मांडू शकत असेल तर आम्ही त्यांना मानू, असंही ते म्हणाले.