रक्षाबंधननिमित्ताने जन प्रहार फाऊंडेशन एक हजार बहिणींना दिली मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:50 PM2021-08-23T17:50:08+5:302021-08-23T17:51:57+5:30
अंधेरीतील जन प्रहार फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत एक हजार बहिणींना ओवाळणी म्हणून मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: आपल्या देशात महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सरचे प्रमाण दिवसें दिवस वाढले असून गर्भाशयाचा कर्करोग स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यावर मात करण्यासाठी एच.पी.व्ही. नामक लस उपलब्ध आहे. परंतू या विषयी जास्त माहिती नसल्यामुळे तसेच ही लस जास्त महाग असल्याने सरकारने देखिल यावर अधिक लक्ष दिले नाही.
हिंदू पंचांगाप्रमाणे काल 'रक्षाबंधनचा सण देशात उत्साहात साजरा झाला. बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. मात्र भविष्यात आपल्या बहिणींना कर्करोग होऊ नये म्हणून रक्षाबंधन निमित्ताने अंधेरीतील जन प्रहार फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत गेली दोन दिवस एक हजार बहिणींना ओवाळणी म्हणून मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस दिली.
महिलांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या सोडविण्यासाठी एच.पी.व्ही. लसीकरण मोहिमे अंतर्गत विभागातील प्रत्येक भागात जन प्रहार फाऊंडेशचे एक एक प्रतिनिधी यांनी घरोघरी जावून महिलांना या विषयी प्रबोधन करून त्यांची नोंदणी करण्यात आली.जनप्रहार संघटनेचे सचिव , महाराष्ट्र राज्य रुगसेवक संघटना व जन प्रहार वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख भिमेश मुतुला यांनी लोकमतला ही माहिती दिली.
9-18 तसेच 18-45 वयोगटातील 1000, मुलींना आणि महिलांना एच.पी.व्हीचे लसीकरण करण्यात आले. 9 ते 18 वयातील मुलींना दोन डोस आणि 18 ते 45 वयोगटातील महिलांना तीन डोस देण्यात येतील, लसीकरणचा दुसरा डोस आणि तिसरा डोसचे वेळापत्रक लवकरच लाभार्थ्यांना कळविण्यात येईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
सदर लसीकरण कार्यक्रम कॅन्सर पेशंट एड असोसिएशन आणि जन प्रहार फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने अंधेरी पूर्व आकाश कॉलेज,पालिका शाळा गुंदवली येथे घेण्यात आला होता.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे उद्धघाटन कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सारनाथ,संचालिका डॉ.भावना शर्मा व सल्लागार राजेश सोनार, जन प्रहार फाउंडेशनचे अध्यक्ष रविकांत शुक्ला आणि भिमेश न रसप्पा मुतुला व विभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अंगणवाडी सेविका आणि जन प्रहार महिला प्रतिनिधींच्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वी झाला.भीमेश मुतुला यांचे या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले. रविकांत शुक्ला यांनी सीपीएए व जनप्रहार फाउंडेशनचे संजीव कलकोरी आणि संपूर्ण कोअर टीमचे आभार मानले.