मुंबई : गोड्या पाण्याच्या तळाशी, भूगर्भात अधिवास असणाऱ्या मत्स्य कुळातील ‘ईल’ या प्रजातीतील नवीन माशाचा शोध मुंबईतून लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी ही प्रजाती प्रकाशात आणली आहे. ग्रामदेवता मुंबादेवी आणि मुंबईवरून या ईलचे नामकरण ‘रक्थमिच्तिस मुंबा’ असे करण्यात आले आहे.
तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना २०१९ साली जोगेश्वरीच्या अंध शाळेतील एका छोट्या विहिरीत ही प्रजाती सापडली होती. त्यानंतर याबाबत संशोधन करण्यात आले. ‘ॲक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचिथोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये २९ सप्टेंबर रोजी या शोधाचे वृत्त प्रकाशित झाले.
प्रवीणराज जयसिम्हा, तेजस ठाकरे, अनिल मोहोपात्रा आणि अन्नम पवनकुमार यांनी या प्रजातीचा शोध लावला आहे. ‘रक्थमिच्तिस मुंबा’ ही भारतात आढळणाऱ्या ‘रक्थमिच्तिस’ कुळातील पाचवी प्रजाती आहे. मुंबईची मूळ देवता मुंबादेवीवरून या शहराला मुंबई हे नाव पडल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच या ईलचे नामकरण मुंबा असे करण्यात आले.
ईलची वैशिष्ट्ये
- भूगर्भात अधिवास असलेली ही प्रजाती अंध आहे. उत्तर पश्चिम घाट परिसरातून शोधण्यात आलेली ही पहिली पूर्णपणे अंध अशी भूगर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यप्रजात आहे.
- या नव्या प्रजातीची निश्चिती आकारशास्त्र, गुणसूत्रांच्या तपासणीनंतर करण्यात आली.
- अंधत्व, पुढच्या दिशेला असलेल्या जबड्यांमधील समानता, श्वसनेंद्रियांचा अर्धचंद्राकार आकार यामुळे हा मासा ‘रक्थमिच्तिस’ कुळात सापडणाऱ्या इतर प्रजातींपेक्षा वेगळा असल्याचे लक्षात आले.
- ‘रक्थमिच्तिस मुंबा’ ही प्रजात अंध असल्याने ती श्वास आणि शरीरातील संवेदनांच्या आधारे आपले भक्ष्य शोधून जिवंत राहते. तिचा आकार ३२ सेंटीमीटर असून ती गुलाबी रंगाची आहे.
मी शोधलेल्या प्रजातींपैकी ‘रक्थमिच्तिस मुंबा’ ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भूगर्भातील अशा प्रजाती आणि त्यांच्या अधिवासावर फार कमी अभ्यास झाला आहे. - तेजस ठाकरे