नवी मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे आणि प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते. या समस्येबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुरुवारी खारघर परिसरात रॅली काढण्यात आली होती. यामध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.रस्त्यावर ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी धान्य टाकले जाते आणि याकारणाने रस्त्यावरील धान्य टिपताना अनेकवेळा पक्ष्यांचा मृत्यू होतो. या विषयी रामशेठ ठाकूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी खारघर परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. पक्षी वाचवा, पर्यावरणाचा समतोल राखा, तसेच रस्त्यावर धान्य न टाकता ते एका भांड्यात ठेवावे, असा संदेश विद्यार्थ्यांमार्फत सर्व स्तरांत पोहोचविण्यात आला. शाळेपासून सुरू झालेल्या रॅलीने जलवायू विहार, शिल्प चौक, डेली बाजार या सर्वच परिसरांतील नागरिकांमध्ये जनजागृती केली. कबुतरांना वाचवा, चिमण्यांची संख्या वाढवा, असे संदेश पोहोचविण्याचे काम या जनजागृती फेरीच्या माध्यमातून करण्यात आले. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव असायला हवी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी दिली.
पक्षी संरक्षणासाठी खारघरमध्ये रॅली
By admin | Published: July 11, 2015 10:31 PM