मुंबई : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहानिमित्त महाड-चवदार तळे मानवमुक्ती संग्राम समितीने नायगाव येथून बाइक रॅलीचे आयोजन केले आहे़ही समिती गेली दहा वर्षे या दिवसाचे औचित्य साधून रॅलीचे आयोजन करत आहे़ यंदा रॅलीत तब्बल ४० बाइकस्वार सहभागी होणार आहेत. ३६० किमीचा रस्ता पार करत हे सर्व जण ४० गावांना या दिवसाचे महत्त्व विषद करणार आहेत. रॅलीची सुरुवात गुरुवार, १९ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता नायगाव येथील जुनी बीडीडी चाळ क्रमांक ६ येथून होणार असून तिचा शेवट शुक्रवार, २० मार्चला चवदार तळे येथे होईल. या रॅलीमागचा उद्देश सांगताना समितीचे सचिव शशिकांत बर्वे म्हणाले, बहुजनांना या तळ्यावर पाणी पिण्यास मनाई होती़ यासाठी डॉ़ आंबेडकर यांनी लढा देऊन रक्ताचा एकही थेंब न सांडता २० मार्च १९२७ रोजी हा सत्याग्रह यशस्वी केला़ असंख्य बहुजनांसाठी हा दिवस म्हणजे मानवतेचा व त्यागाचा संदेश देणारा आहे़ त्यामुळे त्याचे महत्त्व हे अनंतकाळ येणाऱ्या प्रत्येक पिढीला ज्ञात झालेच पाहिजे व डॉ़ आंबेडकरांच्या विचारांची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी ही बाइक रॅली काढली जाते. यंदा या मुक्ती संग्रामाचे ८७ वे वर्ष आहे़ ते लक्षात घेता अधिकाधिक लोकांना या दिवसाचे महत्त्व आम्ही पटवून देणार आहोत़महत्त्वाचे म्हणजे या रॅलीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही़ प्रत्येक जण स्वेच्छेने यात सहभागी होतो़ सुरुवातीपासून या रॅलीत तरुणांचा सहभाग अधिक आहे़ नायगाव हा डॉ़ आंबेडकरांच्या अनुयायांचा बालेकिल्ला आहे़ त्यामुळे ही संपूर्ण रॅली दान मिळालेल्या पैशातूनच काढली जाते, असेही बर्वे यांनी ‘लोेकमत’शी बोलताना स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
चवदार तळे सत्याग्रहानिमित्त रॅली
By admin | Published: March 19, 2015 12:12 AM