मुंबई - भाजप आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माफीनामा जाहीर केला आहे. तसेच बुधवारी एक व्हिडिओ जारी करुन त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. मात्र, सुरुवातीला केवळ खेद व्यक्त करणाऱ्या राम कदमांनी लगेच महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितलीच कशी ? असा प्रश्न अनेकांना पडला. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम कदम यांना फोन करुन माफी मागण्याची सूचना केली होती, त्यानंतरच त्यांना ही उपरती सूचली, अशी माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. राज्यातील अनेक ठिकाणी महिला संघटनांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्या पोस्टरला चपलांचा मार देण्यात आला. तर विरोधकांनीही या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. कारण, राम कदमांच्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावल्याचा संदर्भही मुंडे यांनी दिला होता. तर, या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे राम आणि मी त्यांच्या हनुमान असे कदम यांनी म्हटले होते. त्यामुळेही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात येत होते.
अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी
राम कदम वक्तव्य प्रकरणावरुन भाजप सरकारचे अनेक मंत्री अडचणीत येत होते. महादेव जानकर असतील किंवा विनोद तावडे असतील यांना घेराव घालून जनतेने राम कदमांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ फोन करुन राम कदम यांना माफी मागण्याची सूचना केली, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतरच, कदम यांनी एका व्हिडिओद्वारे दिलगिरी व्यक्त केली. तसेच ट्विटरवरुन आपला माफीनामा जाहीर केला आहे.