मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या (Lakhimpur Kheri Incident) निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने 'महाराष्ट्र बंद' (Maharashtra Bandh) ची हाक दिली आहे. राज्यभरात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले. आता या बंदवरून भाजपचे आमदार राम कदम यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. पालघर हत्या प्रकरण, काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या, मुंबई महाराष्ट्रात अनेक निर्भया प्रकरणनंतर ही कधी महाराष्ट्र सरकारला बंदची आठवण कशी आली नाही, अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे.
आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. शेतकऱ्यांमुळे पोटाला भाकरी मिळते. पण शेतकऱ्यांच्या आडून महाराष्ट्रातील या तिन्ही पक्षांनी तसेच देशातील विरोधी पक्षाने राजकारण करण्याचं दु:साहस करु नये. जर लोकांना जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले गेले, तर आम्ही रस्त्यावर उतरू! पालघर हत्या प्रकरण, काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या, मुंबई महाराष्ट्रात अनेक निर्भया प्रकरणनंतर ही कधी महाराष्ट्र सरकारला बंदची आठवण कशी आली नाही, अशी विचारणा केली आहे.
...तर आम्ही रस्त्यावर येऊ
स्वातंत्र्यानंतर देशात असे कधीही घडले नसेल की, एखाद्या राज्यात ज्या पक्षाचे सरकार आहे, ते सरकारच लोकांना बंदसाठी आवाहन करत आहे. कोरोना कालावधीमध्ये दीड वर्षे बंद होते. आता कुठेतरी सर्वकाही उघडले आहे. जनता अडचणीत आहे, संघर्ष करत आहे. मात्र, या तीन पक्षांनी राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या माथ्यावर हा बंद लादला आहे. गोरगरीबांचे नुकसान होणार आहे, ते कोण भरुन देणार आहे? तुम्ही तीन पक्ष हे नुकसान भरुन देणार आहात का? ज्यांना बंदमध्ये सहभागी व्हायचे नाही त्याचे काय? अशा लोकांवर तीन पक्षाचे लोक बंद करणार असतील, जोर जबरदस्ती करणार असतील तर आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशारा राम कदम यांनी यावेळी बोलताना दिला.
दरम्यान, लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे. लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार? अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात आहे. असे असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे. १०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडले. महाराष्ट्रातील शेतकरी आज कमालीचा अस्वस्थ आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.