मुंबई - अयोध्येतील श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून केंद्र सरकारला टोला लगावला आहे. राम मंदिराच्या श्रेयाचं म्हणाल तर ज्यांचं सरकार आहे, ते श्रेय घेणारच, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. .
आज झालेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या प्रश्नावरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, राम मंदिराच्या भूमिपूजनामध्ये डावलले गेले वगैरे मी म्हणणार नाही. आजचा दिवस आनंदाचा आहे, खुशीचा आहे, अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी राजकारण संपवून टाकले पाहिजे. राम मंदिराच्या लढ्यात अनेकांचे योगदान आहे. एकाच पक्षाचं एकाच संघटनेचं आहे असं नाही. बाकी श्रेयाचं म्हणाल तर ज्यांचं सरकार आहे ते श्रेय घेणारच, असे संजय राऊत म्हणाले. .
दरम्यान, बाळासाहेबांना कुणीही विसरू शकत नाही. कुणी विसरणार नाही. तसेच उद्धव ठाकरे यांना डावललं गेलेलं नाही. आजची परिस्थिती अशी होती की, आजच्या दिवशी तिथे कमीत कमी लोकांनी उपस्थित राहावे, या मताचे आम्ही आहोत. आम्हीसुद्धा यापुढे अयोध्येत जाणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. .
राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका आहेच. मात्र इतर अनेकांचंही योगदान आहे. अशा मताचे आम्ही आहोत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.