Ram Mandir Bhumi Pooja:पहिल्या कारसेवेला मी गेलो, तर दुसऱ्याला माझा भाऊ; कारसेवकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 09:50 AM2020-08-05T09:50:46+5:302020-08-05T09:50:52+5:30
आजच्या दिवशी गुढी उभारणार, मुहूर्तावर रामधून म्हणणार, सायंकाळी दिव्यांची आरास करून स्वागत करणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
मुंबई : रामजन्मभूमी मंदिर आंदोलनात देशाच्या विविध भागांतून लोकांनी कारसेवा केली. मुंबईतूनही कारसेवकांचे जत्थे अयोध्येला रवाना झाले होते. त्यावेळी विशी-तिशीतील आंदोलक आता साठीला पोहोचले आहेत. राम मंदिराचे भूमिपूजन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच अनेकांनी कारसेवेतील आठवणींना उजाळा दिला.
आजच्या दिवशी गुढी उभारणार, मुहूर्तावर रामधून म्हणणार, सायंकाळी दिव्यांची आरास करून स्वागत करणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आमच्यासाठी राम मंदिर म्हणजे एक प्रकारचे सामाजिक आंदोलन होते. अगदी तरुण वयात या आंदोलनाशी जोडला गेलो. आताही यातील बहुसंख्य आंदोलक, कार्यकर्ते, मित्र विविध सामाजिक कार्यांशी जोडलेलो आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचा यातील समान धागा आहे. मंदिर उभारले जात आहे, याच्यासारखा दुसरा आनंद नाही, अशी भावना दादरमधील व्यावसायिक नितीन म्हात्रे यांनी व्यक्त केली. तर, मंदिर उभारणीतून भारत कूस बदलतोय. देशाच्या पंतप्रधानांनी भूमिपूजन करावे, याचा वेगळा संदर्भ असल्याची भावना कारसेवा केलेले आणि पेशाने वकील असलेल्या मंगेश पवार यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे स्वाभाविकच सार्वजनिक ठिकाणी आनंद व्यक्त करायला मर्यादा आहेत, पण आपापल्या घरी आनंदोत्सव आहेच. टीव्हीवर मुहूर्ताचा कार्यक्रम पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पार्ल्यातील व्यावसायिक ६२ वर्षांचे मिलिंद करमरकर यांचा आजचा दिवस कारसेवेतील सहकाऱ्यांशी फोनवर बोलण्यातच गेल्याचे त्यांनी सांगितले. तीस तीस जणांचे अनेक जत्थे विलेपार्ले येथून अयोध्येला गेले. त्या वेळी दोन कारसेवा झाल्या. पहिल्याला मी गेलो, तर दुसऱ्या कारसेवेला माझा भाऊ होता. त्यातले अनेक जण बाहेर आहेत. एक जण सिंगापूरला आहे, काही जण पुण्यात तर बाकीचे पार्ल्यात आहेत. त्यांचे आजच फोन येऊन गेले.
भूमिपूजनाचा हा सोहळा शतकांची तपस्या, संघर्षाचे फलित आहे. सोमनाथाचे पुनर्निर्माण स्वातंत्र्यानंतर लगेच झाले. राम मंदिरासाठी २०२० उजाडावे लागले. कुणाबाबत विरोधाची भावना नाही, पण आमच्यासाठी एका नव्या युगाचा प्रारंभ आहे. पहिले निमंत्रण अन्सारींना गेले, हेसुद्धा खूप बोलके आहे, अशी भावना करमरकरांनी व्यक्त केली.