Join us  

राम मंदिर सोहळा थेट कॅनव्हासवर साकारणार ! अयोध्येत होणार लाईव्ह पेंटिंग

By स्नेहा मोरे | Published: January 10, 2024 7:22 PM

देशभरातील चित्रकारांचा सहभाग

मुंबई - अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती, संस्कृती आणि कलेचा अनोखा संगम अनुभवण्यास मिळणार आहे. या सोहळ्याच्या आठवडाभर आधीपासूनच म्हणजेच १४ ते २२ जानेवारीदरम्यान या ठिकाणी देशभरातील २० चित्रकार लाईव्ह पेंटिग्समधून राम मंदिर सोहळ्याचा प्रवास आपल्या कुंचल्याद्वारे कॅनव्हासवर रेखाटणार आहे. मंदिरावर अखेरचा हात फिरतानाचे क्षण, सोहळ्याची भव्य - दिव्य तयारी ते राम मंदिर लोकार्पण सोहळा असे विविध क्षण या कलाकारांच्या माध्यमातून आपल्या चित्रांमध्ये बंदिस्त करण्यात येणार आहेत.

अयोध्येत ‘अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून वाची  आर्ट लाईव्ह पेंटिंग या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जेव्हा जगभरातून राम भक्त अयोध्येत येतील तेव्हा त्यांना वाची आर्ट लाईव्ह पेंटिंगही पाहता येणार आहे. या उपक्रमात आनंद दास, दिलीप माळी, नानासाहेब येवले, झुनु सरकार, रंजीत सरकार, सोमनाथ बोथे, परमेश पॉल, मधुमिता भट्टाचार्य, सुमन एस गिले, गौत्तम मुखर्जी, उमाकांत तावडे, संजय राऊत, शैलेश गुरव, अर्जुन दास, मनीषा राजू, विजय वाडेकर, किशोर कवाड, किरण कुंभार,  महादेव गावडे, चंद्रा मोरकोंडा या वीस कलाकारांचा सहभाग आहे.

श्रीराम मंदिराचे उदघाटन हा सर्वांसाठी एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. या निमित्ताने सोहळ्यात वैभवाशाली असलेल्या भारतीय कलेलाही स्थान मिळावे अशी इच्छा होती. या विचारातूनच हा उपक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे. या सोहळ्यात भारतीय कलेचे प्रदर्शन होणे ही अभिमानाची बाब असेल. कलाविश्वात एक वेगळी ओळख असलेल्या २० कलाकारांचा समूह यात सहभागी होणार आहे.  कार्यक्रमाच्या आयोजन स्थळी हे कलाकार लाईव्ह पेंटिंग करतील, अशी माहिती या उपक्रमाच्या संयोजिका सुनिता संघाई यांनी सांगितले.

टॅग्स :राम मंदिरअयोध्या