मुंबई : उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. राम नाईक यांनी स्वत:ला गोरंगाव पूर्व, गोकुळधाम येथील लक्षचंडी सोसायटीमधील त्यांच्या घरीच विलगीकरण केले आहे. (Former Uttar Pradesh Governor and Ram Naik Corona infected)
राम नाईक यांना थोडा ताप आला होता. त्यानंतर त्यांनी लागलीच कोरोना चाचणी केली. या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, मालाड पूर्व संजीवनी रुग्णालयाचे डॉ. सुनिल अग्रवाल व डॉ. राजेश बिनयाला यांच्या देखरेखीखाली राम नाईक यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची तब्येत सुधारत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यातील रोज दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येचा उच्चांक गाठत असल्याने कोरोनाचे संकट राक्षसाचे रुप धारण करत आहे. राज्यात रविवारी ६८ हजार ६३१ रुग्ण आणि ५०३ मृत्यूंची नोंद झाली आहे, परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८ असून मृतांचा एकूण आकडा ६० हजार ४७३ झाला आहे.
देशातील रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला; दीड कोटीचा टप्पा पार केला कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल २,७३,८१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,६१९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,५०,६१,९१९ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात १,७८,७६९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.