‘पद्म भूषण’ सन्मानानिमित्त राम नाईक यांचा शनिवारी बोरीवलीत नागरी सत्कार
By मनोहर कुंभेजकर | Published: March 8, 2024 12:06 PM2024-03-08T12:06:01+5:302024-03-08T12:09:13+5:30
राम नाईक यांची संसदीय कारकीर्द 1978 मध्ये बोरीवलीतून सुरु झाली. सलग तीनवेळा बोरीवलीतून ते आमदार म्हणून निवडले गेले, तर त्यानंतर सलग पाचवेळा उत्तर मुंबईतून खासदार म्हणून जिंकून आले होते.
मुंबई-भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचा राष्ट्रपतींनी ‘पद्म भूषण’ सन्मान जाहीर केल्याबद्दल शनिवार,दि, 9 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता बोरीवली (पूर्व) येथील गोपाळजी हेमराज हायस्कूलच्या पटांगणावर भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
राम नाईक यांची संसदीय कारकीर्द 1978 मध्ये बोरीवलीतून सुरु झाली. सलग तीनवेळा बोरीवलीतून ते आमदार म्हणून निवडले गेले, तर त्यानंतर सलग पाचवेळा उत्तर मुंबईतून खासदार म्हणून जिंकून आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांचा मुंबईकरांतर्फे नागरी सत्कार बोरीवली येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सत्कार समारंभास भाजपा मुंबईचे अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून, तर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
याखेरीज आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, विजय (भाई) गिरकर, अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनिल राणे, प्रकाश सुर्वे, अमित साटम, राजहंस सिंह व सर्वश्रीमती मनिषा चौधरी, विद्या ठाकूर, डॉ.भारती लव्हेकर यांच्यासह जनसेवा बँकेचे अध्यक्ष अँड. जयप्रकाश मिश्रा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक डॉ. विष्णू वझेही हजर राहाणार आहेत.
राम नाईक यांच्या जाहीर अभिनंदन सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजक सर्वश्री आर.यु.सिंह, जयप्रकाश ठाकूर, गणेश खणकर व संतोष मेढेकर यांनी केली आहे.