मुंबई : राज्यपाल पदाच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत राम नाईक यांनी उत्तर प्रदेश ‘उत्तम प्रदेश’ करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केले. आपण केलेल्या कार्याचा अहवाल लोकांपुढे नियमितपणे मांडणारे राम नाईक देशातील सर्व राज्यपालांसाठी आदर्श राज्यपाल आहेत. विरोधी पक्षात असो वा सत्तापक्षात असो, लोकसेवा हा धर्म मानणारे राज्यपाल राम नाईक यांचे सार्वजनिक जीवन भावी लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक असल्याचे गौरद्वगार महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले.राम नाईक यांच्या अनुभवपर आत्मचरित्रात्मक लेखांचे संकलन असलेल्या ‘चरैवेति, चरैवेति’ या ग्रंथाच्या सिंधी आवृत्तीचे प्रकाशन विद्यासागर राव यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल राम नाईक, आमदार आशिष शेलार, भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष लछमनदास चंदीरामाणी, महेश तेजवानी, लढाराम नागवाणी, अजित मन्याल व अनेक मान्यवर उपस्थित होते. एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान येथील स्मारकावरील सावरकरांच्या काव्य पंक्ती काढल्यानंतर राम नाईक यांनी तो मुद्दा संसदेत प्रखरपणे मांडला व कालांतराने त्या पंक्ती त्या ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसविल्या, याचे स्मरण विद्यासागर राव यांनी दिले. रेल्वे राज्य मंत्री या नात्याने राम नाईक यांनी जनसामान्यांचा रेल्वे प्रवास सुखद करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले, तर पेट्रोलियम मंत्री म्हणून त्यांनी एलपीजी गॅस जोडण्या अधिकाधिक लोकांना दिल्या. सामान्यांशी नाळ कायम जोपासलेले राम नाईक उत्कृष्ट लोकसेवक असल्याचे विद्यासागर राव यांनी सांगितले. आपल्या प्रदीर्घ वाटचालीत लालकृष्ण अडवाणी, हशू अडवाणी, कर्करोग तज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांसह अनेक सिंधी बांधवांचे योगदान राहिले असल्याचे राम नाईक यांनी नमूद केले.
राम नाईक यांचे सार्वजनिक जीवन भावी लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक - राव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 11:33 PM