‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’ मुंबई शहर, उपनगरांत रामनवमी उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:40 AM2024-04-18T10:40:35+5:302024-04-18T10:42:12+5:30
रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला.
मुंबई : रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला अन् ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’, ‘सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय... प्रभू रामचंद्र भगवान की जय’... अशा जयघोषाने वडाळा श्रीराम मंदिर परिसर दुमदुमून गेला. कीर्तन, भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले. शहर व उपनगरांतील विविध मंदिरांमध्ये रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. राम मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू होती.
अयोध्येच्या राम मंदिर स्थापनेनंतर पहिल्या रामनवमी उत्सवात तरुणाईपासून ज्येष्ठांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. महाराष्ट्रातील अयोध्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या वडाळा येथील राम मंदिरात रामनवमीचा उत्सव बुधवारी उत्साहात साजरा झाला. त्याचप्रमाणे, गिरगाव झाबवावाडी, वडाळा येथील विठ्ठल मंदिर, काॅटनग्रीन येथील प्राचीन राम मंदिरांमध्ये राम जन्माचा सोहळा भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. वडाळा येथील हे राम मंदिर सुमारे ७० वर्षे जुने असून, दरवर्षी मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव येथे साजरा केला जातो.
या मंदिरात दिवा लावून त्यानंतर सलग १० दिवस रामनवमीनिमित अनेक धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अखंड पूजा, महाप्रसाद, आरती, रामाची पालखी, राम जन्मोत्सवानिमित्त रामाचे पाळण्यातील दर्शन भाविकांना दिले जाते. रामनवमीच्या या दहा दिवसांच्या सोहळ्यात सुमारे एक लाखांहून अधिक भाविक मंदिराला भेट देतात. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी महापूजा झाल्यानंतर उत्सवाची सांगता केली जाते.