पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्राद्वारे मुंबईच्या फेरीवाल्यांना राम रामचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 12:47 PM2024-05-12T12:47:40+5:302024-05-12T12:48:20+5:30
या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पाठवलेला ‘राम राम’चा संदेश हजारो फेरीवाल्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश असलेले पत्र विलेपार्ले येथील फेरीवाला बांधवांना शुक्रवारी देण्यात आले. या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पाठवलेला ‘राम राम’चा संदेश हजारो फेरीवाल्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
उत्तर मध्य मुंबईत महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्रा आणि मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी विलेपार्ले येथे फेरीवाला बांधवांशी थेट संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेत फेरीवाल्यांनी मोदी आणि योगी यांच्या विकासकामांचे कौतुक केले.
पूर्वी ग्राहकांशी पैशांची देवाणघेवाण करताना वारंवार वाद व्हायचे; पण, आता मोदीजींनी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मोठा दिलासा मिळाला असून, चोरीला आळा बसला आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहाराची भीतीदेखील संपली आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारची स्तुती केली.