संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - स्वरसम्राज्ञी, गानकोकीळा, गानसरस्वती अशा विविध विशेषणांनी संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर आज जरी शरीराने आपल्यात नसल्या तरी आवाजाद्वारे अजरामर आहेत. अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन लतादीदींच्या जीवनातील अखेरच्या टप्प्यात रेकॉर्ड करण्यात आलेल्या राम भजनाने होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे अगदी जेमतेम स्वत:च्या पायावर उभे राहण्याची शक्ती अंगी असताना लतादीदींच्या आवाजात राम भजन, श्लोक आणि मंत्रांचे ध्वनीमुद्रण करण्यात आले होते. हे राम भजन आणि श्लोक दीदींची शेवटची रेकॉर्डिंग ठरली. जीवनातील अखेरच्या टप्प्यात असताना लतादीदींनी संगीतकार मयुरेश पै यांना बोलावून त्यांना अयोध्येतील राम मंदिरासाठी काही निवडक राम भजन, श्लोक आणि गाणे रेकॉर्ड करायचे असल्याचे सांगितले. रामाचे हे भजन जानेवारी २०२४मध्ये अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी वाजवले जावे अशी दीदींची इच्छा होती असे मंगेशकर कुटुंबियांशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून समजले आहे. त्यानुसार अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी लतादीदींच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलेले अखेरचे राम भजन वाजवण्यात येणार असल्याचे समजते.
संगीतकार मयुरेश पै यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. याबाबत पै म्हणाले की, दीदी शेवटपर्यंत गात होती आणि काम करत होती. तिचा आवाज राम मंदिराचा भाग व्हावा अशी तिची इच्छा होती. तिची तब्येत ठिक नसतानाही तिने रेकॉर्डिंग पूर्ण केल्याचेही पै म्हणाले.