'कोरोनामुळे राम मंदिराच्या पायाभरणीसाठी सध्याचं वातावरण मंगलमय नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 05:16 PM2020-07-24T17:16:58+5:302020-07-24T17:18:26+5:30
‘‘कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं.
मुंबई - अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपुजनाच मुहूर्त ठरला असून येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विधानानंतर कोरोनाच्या महामारीत राम मंदिर एवढे महत्त्वाचे आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्याचं वातावरण मंगलमय नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, शरद पवार यांच्या विधानाचंही त्यांनी समर्थन केलंय.
‘‘कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवं’’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाला अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनावरून टोला लगावला होता. त्यावरून, राजकीय वर्तुळात वाद-प्रतिवाद, टीका-टिप्पणी, उलटसुलट चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण येणार का आणि ते अयोध्येला जाणार का?, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. तर, आता शरद पवारांच्या या विधानाचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्थन केलंय.
राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तो सर्वांनी मान्य केला आहे. पण सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने परिस्थिती खराब झालेली आहे. वातावरण मंगलमय नाही, आपण एखादे देऊळ बांधतो तेव्हा वातावरण प्रसन्न पाहिजे. मात्र, आज ती परिस्थिती नाही, पवारांनाही तेच म्हणायचे होते, असं म्हणत मुश्रीफ यांनी पवारांचं समर्थन केलं. तसेच, राममंदिर हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्याला विरोध नाही, फक्त कोणत्या परिस्थितीत कोणतं कार्य केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बरं प्राधान्य कशाला द्यावं हे पवारांनी सांगितलं तेच शंकराचार्यांनीही सांगितलं. त्यांनी राम मंदिराचा मुहूर्त शुभ नसल्याचं म्हटलं आहे, याचीही आठवण मुश्रीफ यांनी करुन दिली.
दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी 5 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 12 वाजता पूजा करून मंदिर बांधणीसाठी पायाभरणी करतील. पण, या भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून वादाला तोंड फुटले आहे. राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्तावर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी भूमिपूजनाचा मुहूर्त अशुभ असल्याचे म्हटले आहे. तसेच, मंदिराच्या बांधकामासाठी जनतेचे मत घ्यावे, अशी मागणीही शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी यापूर्वी केली आहे.