मुंबई : मुस्लिम धर्मात महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या रमजानचे रोजे (उपवास ) शनिवारपासून सुरवात होत आहे. कोरोनाच्या पादुर्भावामुळे यंदा या पवित्र महिन्याच्या सार्वजनिक उत्साहाला खो बसला असून सर्व विधी घरीच पार पाडावयाचे आहेत. शुक्रवारी काही ठिकाणी चंद्र दर्शन झाल्याची साक्ष मिळाली आणि सौदी अरेबियामध्ये पहिला रोजा पार पडला, त्यामुळे आज रात्री पहिली तराबीह आणि शनिवारपासून रोजे करन्याचा निर्णय हिलाल कमिटीच्यावतीने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या कालावधीत नमाज ,रोजा सोडणे (इफ्तारी), कुराण पठण आणि या महिन्यातील रात्रीची विशिष्ट नमाज (तरावीह) ही सर्व कर्तव्ये मुस्लिम बांधवानी आपापल्या घरातच करण्यात यावी, घराबाहेर अजिबात पडू नका,असे आवाहन समाजातील धर्मगुरु, अभ्यासक, राज्य सरकार व पोलिसांनी केले आहे. कोविड-19 च्या वाढत्या संक्रमनामुळे राज्यातील लॉकडॉऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यात त्याचा पादुर्भाव वाढत राहिला आहे. त्यामुळे तीन जिल्ह्यात टाळेबंदी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुर्ण रमजानच्या महिन्यात घरातच सर्व धार्मिक विधी पार पडावे लागणार आहेत. रमजानच्या रोजेमुळे मानसिकदृष्ट्या खंबीर आणि मन स्वच्छ होतात. त्यामुळे या पवित्र महिन्यात लॉकडाऊनचे पुर्णपणे पालन करा, घरातून अजिबात बाहेर पडू नका, सर्व धार्मिक विधी घरातच करून प्रशासनाला पुर्ण सहकार्य करा, असे आवाहन उलेमा कमिटी, जमाते ए इस्लामी, रझा अकादमी आदी संघटनाच्यावतीने करण्यात आले आहे.
---------------------------------
पोलिसांची करडी नजर एरवी रमजानच्या काळात मस्जिदमध्ये मोठी गर्दी असते, तसेच बाजारातही खरेदीसाठी गर्दी करत असतात.मात्र यंदा टाळेबंदीमुळे या सर्वांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्याना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमली आहेत. तसेच डोंगरी, महंमद अली रोड, पायधुनी आदी परिसरात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवानी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे.