मुंबईसह देशभरात उद्या साजरी होणार रमजान ईद।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:06 AM2021-05-13T04:06:45+5:302021-05-13T04:06:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना महामारीचे सावट असलेली सलग दुसरी रमजान ईद (ईद उल-अजहा) येत्या शुक्रवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना महामारीचे सावट असलेली सलग दुसरी रमजान ईद (ईद उल-अजहा) येत्या शुक्रवारी मुंबईसह भारतात साजरी होत आहे. बुधवारी भारतात कुठेच चंद्रदर्शन झाल्याची साक्ष न मिळाल्याने त्याचप्रमाणे सौदी अरेबियात गुरुवारी ईद होत असल्याने १४ मे रोजी भारतात ईद साजरी करण्याचा निर्णय हिलाल कमिटीच्यावतीने घेण्यात आला.
गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच रमजानचे ३० रोजे (उपवास) होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कायम असल्याने यावर्षी रमजान ईद साधेपणाने घरच्या घरी नमाज पठण करून साजरी करावी, असे आवाहन गृह विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
मशीद, ईदगाह आदी सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पूर्ण महिनाभर रोजे, नमाज व अन्य धार्मिक विधी ज्या पद्धतीने घरीच साजरे केले, तसेच ईदही साधेपणाने साजरी करावी, मिरवणूक, शोभायात्रा काढू नये, मशीद, दर्ग्यामध्ये जाण्यास नागरिकांना बंदी आहे, अशा मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.
गेल्या १४ एप्रिलपासून रमजानचे रोजे सुरू आहेत. गुरुवारी त्याची सांगता होणार आहे. सौदी अरेबियामध्ये भारताच्या एक दिवस आधी ईद साजरी होते. मंगळवारी तिकडे चंद्रदर्शन न झाल्याने सौदी सरकारने गुरुवारी ईद करण्याचा निर्णय घेतला आहे.