लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परकीय राजवटीत भारतातून अनेक लोकांना दूरदेशात मजूर म्हणून नेले गेले तसेच काही लोक अन्यत्र स्थलांतरित झाले. मात्र त्या - त्या देशांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या लोकांनी धर्म व संस्कृती न बदलता रामकथा जपून ठेवली; तसेच रामाचे जीवन, साहित्य व चरित्र आपापल्या पद्धतीने मांडले. जगातील विविध प्रांत व देशांमधील रामकथा कलेच्या माध्यमातून पुढे आणणारे ‘रामकथामाला’ हे पुस्तक माहितीपूर्ण व बोधप्रद असून, नव्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि दीपाली पाटवदकर यांनी लिहिलेल्या रामकथामाला या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी राजभवनात करण्यात आले. ‘राम अनंत रामकथा अनंत आहे,’ असे सांगून लोकांच्या पिढ्या जन्मतील आणि कालप्रवाहात जातील, परंतु रामकथा शाश्वत व कालजयी राहील, असे राज्यपाल म्हणाले.
रामकथामाला या पुस्तकातून वाल्मिकी, कालीदास यांच्यापासून गदिमा यांच्यापर्यंत विविध कवींनी लिहिलेली रामकथा आली आहे. लोकसाहित्यातील, वनवासी परंपरेतील आणि लोककलेतील विविध रामकथांचे वर्णन आले आहे. जैन, बुद्ध व शीख साहित्यातील रामकथांची माहिती आली आहे. रामकथेचे महत्त्व, त्याचा समाजावर व राष्ट्रावरील प्रभाव या पुस्तकात सांगितला आहे, असे लेखिका दीपाली पाटवदकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी केले.